Agristack भारत एक कृषिप्रधान देश असून, देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषि क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करत्ता अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय इ. जोपासणे, कृषि मालास साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात कृषि क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या ५५ टक्के आहे. कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करुन योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून कृषि क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे.
Agristack हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे.
या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.
विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. सदर अभिलेखांपैकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीने अद्ययावत केले जात असल्याकारणाने तात्काळ उपलब्ध होऊ शकतात.
याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होत आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे. याचा वापर करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबविणे शक्य आहे.
बीड जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्मिती करण्याचा पथदर्शी कार्यक्रम राज्यात राबविण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात संकलित शेतकरी माहिती संचाच्या आधारे जनसमर्थ योजनेच्या माध्यमातून राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते प्रायोगिक स्वरुपात १५ ते ४५ मिनिटांत ६ शेतकऱ्यांना ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) उपलब्ध करुन देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरुन महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने अॅग्रिस्टॅक योजना अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्वतयारी जमाबंदी आयुक्त व कृषि आयुक्त स्तरावर करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने कृषि आयुक्त कार्यालयाने संदर्भिय पत्र क्र. १० येथील दिनांक ०३.१०.२०२४ च्या पत्रान्वये अॅग्रिस्टॅक योजनेचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
शासन निर्णयः
राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Agristack योजनेची उद्दिष्टे:-
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत्त (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे.
शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे.
शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणेशेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे तसेच प्रमाणिकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे.
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषि व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे.
उच्च-गुणवत्तेचा डेटा व अॅग्रि-टेकद्वारे कृषि उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे.
Agristack योजनेचे अपेक्षित फायदेः
पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल.
पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल.
शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील.
पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल.
किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
शेतकऱ्यांसाठी कृषि कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषि सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल.
शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही.
शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल.
Agristack योजनेचे प्रमुख्य घटक:-
AgriStack योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे तीन पायाभूत माहिती संच निर्माण करण्यात येणार आहेत. सदर तीनही पायाभूत माहिती संच हे अॅग्रिस्टॅक योजनेसाठी आवश्यक इतर माहिती संच जसे बियाण्यांचा माहिती संच, कीटकनाशकांचा माहिती संच, मागणी बाबतचा माहिती संच, पुरवठ्याचा माहिती संच आदी कृषि विषयक धोरण आखणे व सबसिडी आधारीत योजना निर्मितीसाठी आवश्यक आहे.
अ) शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (Farmers Registry).
ब) हंगामी पिकांचा माहिती संच (Crop Sown Registry)
क) भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच (Geo- Referenced Land Parcel Cadastral Map)
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.